मी दहावी पर्यंत माझ्या गावात म्हणजे अंकलखोप मधेच वाढलो.त्यावेळेस ते एक छोटसं गाव होतं, खेडेगाव म्हण.गावातल्या सगळ्या आठवणी मोकळ्या करायच्या तर मला माझं आयुष्य लागेल. आता जे आठवतेय किवा जे मनात घोळत आहे ते सांगतो. माझ्या गावाला तीन बाजूने कृष्णा नदीने वेढलय.“संथ वाहते कृष्णा माई” असे म्हंटले जाते तिला. मला जेवढे आठवतं तसं मी सातवीला असताना पोहायला शिकलो. शिकताना गटांगळ्या हि भरपूर खाल्ल्या. या नदीच्या बरोबर मधोमध एक थडगे आहे (आम्ही तर त्याला थडगेच म्हणायचो) कुणाचे होते काय होते माहित नाही. आणि त्यावेळेस असे विचार पण मनात यायचे नाहीत.) रोज सकाळी आणि सुट्टीच्या दिवशी जवळपास दिवस भर म्हण आम्ही त्या मातेच्या उदरात पहुड्लेलो असायचो. त्या थडग्यावर जाऊन सूर मारण्यात खूप मजा यायची. सूर ला आम्ही “खोच” म्हणायचो. आम्ही कित्येकदा नदी पार करून पलीकडे जायचो. तिथे कलिंगडच्या आणि काकडी (गावात त्याला आम्ही वाळूक म्हणायचो)चे शेत असायचे. मग काय आणखीनच मज्जा. पलीकडे जाऊन मनसोक्त वाळके खायची. कलिंगड खायचे. आमचा ग्रुप( गावात आम्ही घोळका म्हणायचो) किती कलिंगडे आणि वाळके फस्त करायचो आम्हालाच माहित नाही. कधी कधी तर इतके खाले कि त्या दिवशी जेवायाचोच नाही. पण शेवटी ते पण कुणा तरी शेतकऱ्याचे शेत च ना. मग काय तो शेतकरी हातात काठी घेऊन ओरडत (माझ्या भाषेत बोम्बलत किवा ठोकत च) यायचा. कधी कधी एक दोन काठ्या पण खाल्ल्यात. पण पळत पळत नदीत उड्या मारायच्या आणि ऐलतीरावर पसारा व्हायचो.
अशा अनेक आठवणी माझ्या आणि माझ्या गावाच्या नदीच्या बाबतीत आहेत. एक उदाहरण दाखल इथे वर नमूद केली.
आता काही अनुभव माझ्या माझ्या ग्रामदैवते बाबतीतचे.
माझ्या गावाचे नाव दोन देवावरून पडले. एक अंकलेश्वर आणि दुसरे खोपेश्वर. आमच्या गावाच्या देवाचे नाव म्हसोबा. आता अंकलेश्वर आणि खोपेश्वर पैकी कोण म्हसोबा हे आठवत नाही. म्हसोबाचे देऊळ सर्व बाजूने चिंचेच्या झाडांनी व्यापलेले (सुटले का तोंडाला पाणी!). त्यामुळे आम्ही म्हसोबाच्या बागेतच म्हनायचो. चिंचेच्या झाडावर चढून घाभूळलेल्या चिंचा काढायच्या (घाभूळलेल्या चिंचा म्हणजे ज्या अजून पूर्ण पिकलेल्या हि नसायच्या आणि पूर्ण कच्च्या पण नसायच्या. त्याची चव च खूप वेगळी आणि छान असायची). मनसोक्त खाऊन राहिलेल्या घालायच्या फाटक्या चड्डीच्या खिशात आणि शेजारच्या मुलीना (म्हणजेच पोरींना/मैत्रिणींना ) वाकुल्या दाखवत खायच्या. कधी कधी आलीच एकाधि रडकुंडीला तर द्यायचो हि (मन मोठे करून!). आम्ही फक्त चिंचा खायचो नाही तर त्यांनी खेळायचो. कच्या चिंचांनी. वर बसणारयाने (म्हणजे झाडावर) खाली असलेल्याना चिंचा फेकून मारायच्या. त्या पडलेल्या चिंचा परत खाल्च्याने वर आम्हाला मारायच्या. कधी कधी चिंचेचे टोक लागून खोक फुटायची.
मला माझ्या शेतात या बागेतून कायम जावे लागायचे. कारण या बागेच्या पुढे माझे शेत होते. तिथे ९०% वेळेस ऊस असायचा आणि कधी कधी सोयाबीन असायचे. माझं शेत रस्त्याकडेला नव्हते. रसत्याकडेच्या शेतात आमचा शेताचा शेजारी कधी कधी केळी पिकवायचा. केळी जराश्या पिकायला आलेल्या असल्या कि घडातून एक दोन फण्या काढ्याच्या आणि केळीच्या वाळलेल्या पानात शेतात च खड्डा करून पुरायच्या. दोन दिवस जाऊ द्यायचे. एवढ्या मोठ्ठ्या शेतात आपण केळी कुठे पुरल्या ते कळायला नको का? म्हणून तिथे खूण म्हणून काहीतरी रोवायचे. रोजच मला वैरण (जनावरांना घालायला लागणारा चारा) आणायला जावे लागायचे. उत्कंठा लागलेलीच असायची कधी केळी पिकतील याची. त्यामुळे रोज थोडे थोडे open करून बघायचो पिकल्या का ते. कसेतरी एक दोन दिवस वाट पाहायची आणि पिकलेल्या असतील तर उत्तमच नाही तर अर्धकच्च्या पण मनसोक्त खायच्या. कधी कधी तर केळाच्या झाडाला पिकलेल्या पण मिळायच्या. त्या पण फस्त करायचो.
आता माझ्या गावाच्या जत्रा आणि यात्रे बाबतीत तुम्हाला सांगतो. माझ्या गावाला जत्रेची खूप जुनी परंपरा आहे (किती वर्षापूर्वीची हे माहित नाही!). माझ्या गावाला जत्रा आणि यात्रा दोन हि गोष्टी असतात. आता तुम्हाला हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे कि जत्रा आणि यात्रा? यात आणखी कसला फरक असतो? तर आमच्या गावात असतो. जत्रा म्हणजे जिथे non-veg म्हजेच बोकड आणि कोंबडे कापतात त्याला आम्ही जत्रा म्हणायचो आणि purely फक्त देव एके देव no such non-veg…त्याला यात्रा म्हणायचो.
तर म्हसोबाच्या जत्रेला बोकड आणि कोंबडे कापले जायची देवा समोर.याला आम्ही जत्रा म्हणायचो.
माझ्याच गावाची ज्याला ग्रामपंचायत आहे त्या औदुंबर इथे म्हणजे hardly एक किलो मीटर वर दत्ताचे म्हणजे गुरु माऊलीचे मंदिर आहे. तिथे दो वेळेस यात्रा भरायच्या. गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती
आमच्या गावची म्हसोबाची जत्रा ५ दिवसांची असते. त्या दिवसांचे महत्त्व खाली लिहिले आहे.
१. पहिला दिवस –मानाचा बकरा
२. दुसरा दिवस – मानाचा गाडा
३. तिसरा दिवस – बाहेर गावाहून आलेल्या लोकासाठी बोकड/कोंबडा कापणे etc. पण हा दिवस कायम असतोच असे नाही. So कधी कधी फक्त चार दिवसांची जत्रा असते.
४. चौथा दिवस. – गाव नैवेद्य.
५. पाचवा दिवस – पालखी आणि सासन काठ्या (हा दिवस कायमचा ठरलेला म्हणजे राम नवमी)
नक्षत्र प्रमाणे वरचे दिवस गुरव लोक ठरवायचे.
मानाचा बकरा गावच्या पाटलांचा, मानाचा गाडा (म्हणजे बैलगाडी) गावच्या मानाच्या गायकवाडाचा. ते मानाचे बकरे कापल्या शिवाय कोणाचा हि बकरा कापला जायचा नाही आणि मानाचा गाडा निघाल्याशीवाय बाकीचे गाडे निघायला परवानगी नाही. गाडा म्हणजे बैल गाड्या. बैलांना नटवून सजवून ...बैलगाडीला सजवून त्यांची मिरवणूक काढायची. मानाच्या बकर्याला कापायच्या आधी त्याची हि गाव्मधून मिरवणूक काढायची (अमानुष पणा आहे पण..हि रीत आहे).
आधी आधी गाड्यांमध्ये स्पर्धा असायची. कोणाचा गाडा रुबाबात येतो. कोण जास्त खर्च करते या वरती रुबाब असायचा. मग या रुबाबाच्या हट्टापायी लोक तमाशातल्या मुलीना हि गाड्या समोर नाचवायचे. कोण चांगल्या म्हणजे देखण्या किवा ठसकेबाज नाचणाऱ्या आणेल त्याचा रुबाबा जास्त. हे पुढे जास्त व्हायला लागले. लोक दारू पिऊन त्या मुलींना त्रास द्यायला लागले. Vulgar पणा जास्त होऊ लागला तेव्हा पासून फक्त गाड्या सजवून साधी मिरवणूक काढायला सुरुवात झाली. म्हणजे हा ग्रामपन्चायतीने हा निर्णय घेतला. तेव्हापासून हा धिंगाणा बंद झाला. पण या जत्रेची मज्जा न्यारीच आहे.(आता हि आहे पण बालपनातली मज्जा आता अनुभवत येत नाही हा भाग वेगळा).
आता गाव नैवेद्याविषयी बोलूया. सकाळी सकाळी उठून घरच्यांनी पुरण पोळीचे नैवेद्य बनवायचे. आमचे १३ देवांचे नैवेद्य असायचे. पायात चप्पल न घालता सगळे गावभरचे नैवेद्य नारळसहित करून यायचे. नारळाचे पाणी पिऊनच पोट भरायचे. नारळ फोडल्या नंतर एक भाग त्या त्या पूजार्याचा आणि राहिलेला आमचा. ते परत वळवून माझी आई किवा माझी बहिण (तिला मी माई म्हणायचो) बर्फ्या करायच्या.
मला अजून हि आठवतात त्या देवांची नावे.
१. सुरुवात म्हसोबाने करायची.
२. मग मागली आई म्हणजे म्हसोबाची आई.
३. बनशंकरी (आमची कुल दैवता) आमच्या वडिलांनी (मी बापू म्हनायचो त्यांना) त्या मंदिरासाठी कळस दिला होता. त्यावर माझ्या बापूंचे नाव पण आहे. मी उत्सुकते पोटी ते नाव पण पाहिल्याचे मला आठवते.
४. आमकाई (माझ्या म्हसोबा देवाच्या जवळच्या शेतातला देव)
५. मरी आई.
६. अंबाबाई (ती औदुंबर जवळची नव्हे)
७. महादेव (अंकलेश्वर)
८. नदी
९. सिद्धोबा / सिद्धेश्वर.
१०. खोपेश्वर/बसवेश्वर.
११. मारुती
१२. नरसिंह
१३. ताई-आई
जवळपास पूर्ण गावाला वेढा व्हायचा आणि अजून हि होतो.
शेवटचा दिवस पालखी. पालखीला पण बरेच मानाचे प्रकार होते. पालखी फक्त गुरवांनीच पकडायची. ते हि ज्याचा त्या वर्षी मान आहे त्यांनी.
बारा बलुतेदार हा प्रकार आपण शाळेत ऐकला आहे. त्या सर्वांना काही ना काही मान या जत्रेत असायचाच. खाली काही उदाहरणे देतो म्हणजे तुम्हाला समजेल.
१. शिंपी – कोल्त्या किवा समया पालखी समोर पकडणे.
२. मांग/महार - त्यांनी डमरू/हलगी वाजवायची
३. लिंगायत/चौगुले – खरे तर म्हसोबा लिंगायत त्यामुळे त्याना मान वेगळा. त्यांची एक चांदी ची काठी होती ती त्यांनी मिरवायची.
४. धनगर – त्यांनी ढोल वाजावायचे.
५. न्हावी – आठवत नाही
६. चांभार – आठवत नाही.
७. कुलकर्णी/जोशी - आठवत नाही.
८. कुंभार - आठवत नाही.
९. सुतार
१०. लोहार
११. सोनार
१२. परीट
१३. कोळी – पालखी बरोबर पाणी carry करणे.
पालखी देवाच्या मंदिरापासून सुरु होऊन तिथेच विसर्जित होते.गुलाल खोबर्याची उधळण असायची. गुलाल सगळ्यांना माखायचा. नका तोंडात जाईपर्यंत लावायचा मित्र-मित्रांनी. आम्ही कधी ओळखू यायचे नाही आमच्या पाहुण्यांना. इतके आम्ही लाल भडक झालले असायचो.पालखी वर गुलाल खोबरे उधळायची परंपरा आहे.पालखी अंकलेश्वराजवळ (महादेव)आली कि तिला पळवायची असा हि एक प्रघात आहे. मला कारण माहित नाही. पण कोणी चुकून आडवे आले कि त्याची खैर नसायची. त्यामुळे तिथून जाताना ओरडत ओरडत पालखी न्यायची.म्हणजे लोक आधीच alert व्हावेत.
तुम्हाला सासन काठी हा प्रकार माहित असेल बहुदा. या उंचच्या उंच काठ्या असतात. चार बाजूने चार दोऱ्या/कासरे बांधलेले असतात पडू नये म्हणून.प्रत्येक बलुतेदारची एक अश्या १२ काठ्या पालखीच्या पुढे नाचत नाचत जायच्या. लोकांचे खांदे भरूण यायचे.तिला नाचवता नाचवता पण ती नशा इतकी बेदुंध असायची कि कुणाला हि त्यावेळेस नाचवताना कंटाळा यायचा नाही.
कधी कधी त्या काठीवर आपल्या मुलांना बसवायचे आणि काठ्या नाचवायच्या.
एकदा पालखी मंदिरात पोहोचली कि मग ती मंदिर भोवती ५ प्रदक्षिणा घालायची तेव्हा गुलाल आणि खोबरे याची उधळण व्हायची, लोक आपल्या हातातले गुलाल खोबरे पालखी वर टाकायचे आणि पडलेले स्वतः घ्यायचे आणि ते खायचे. देवावरून ओवाळून पडलेलं म्हणून चांगले असते असे लोक मानत. मग हा सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर आम्ही नदीला अंघोळीला जात आसू. पण एक आठवडा तरी लागायचा अंगावरची गुलाल पूर्ण निघायला.
अशा कितीतरी आठवणी माझ्या मनात आहेत त्यातल्या काही मी इथे सांगितल्या. आणखी काही आठवल्या तर पुढच्या blog मध्ये ......................