विचारांचे काहूर माजणे म्हणजे काय याचा अलीकडे अनुभव येतोय. जवळ जवळ रोजच मला पहाटे पहाटे झोपच येत नाही. का याचे कारण शोधण्याच्या फंदात मी अलीकडे पडत नाही. ते लिहायला गेलो तर किती दिवस लागतील आणि काय काय लिहीन याचा हि मला अंदाज नाही. मग अशा खोल डोहात गटांगळ्या खाण्यापेक्षा कधीही एकच विचार घेऊन त्याच्या बाबतीत काहीतरी लिहिणे कधीहि चांगलेच ना!
म्हणून ठरवले आज पासून जेव्हा केव्हा आपल्याला लिहायची हुक्की (कि हुक्का!) येईल तेव्हा तेव्हा गादीवर मरगळत विचार करत पडण्यापेक्षा त्यांना लिहिण्यावाटे मोकळे करून द्यायचे.म्हणून हा माझा तसा पहिला धडा म्हणालात तरी चालेल.
मग आजच्या सगळ्या विचारांच्या वादळात सागर हया विषयाबाबतीत मनाचे आणि विचारांचे एकमत झाले. त्याला कारण पण छान होते म्हणा. मागच्या आठवड्यात सुट्टी घेऊन गावी गेलो होतो. त्यातल्याच काही दिवसांना कोकणच्या समुद्र किनाऱ्याची आस लागली होती. नशिबाने माझा मेहुणा चिपळूणला आहे. तेव्हा बेत आखून त्याच्याकडे गेलो होतो. तेव्हा गुहागर आणि वेळणेश्वर ह्या दोन समुद्र किनारी जाण्याचा योग आला. ह्या विषयाला चालना मिळाली ती यामुळे.
विषय खूप वेगळा आहे पण त्याचा उगम झाला समुद्राच्या पोटात. हि बहुतेक सगळ्यांचीच सवय आहे. लिहिणारयाची आणि वाचणारयाची हि. जसे एखादी कवीता एकाला वेगळ्या रुपात भावते तर दुसऱ्याला दुसऱ्याच रुपात. जो तो त्या कवितेचा अर्थ त्याच्या अनुभवाप्रमाणे स्वतःशी लावतो तसेच काहीतरी. असो. जास्त प्रस्तावना झाली कि महत्वाचा विषय बाजूला राहतो.
वेळनेश्वरच्या समुद्र किनारयाला पाय लागेपर्यंत दुपारचे ४ वाजले होते. याचा अर्थ मी चिपळूणहून अगदी सकाळी सकाळी बाहेर पडलो होतो असे नाही. १२ वाजता बाहेर पडलो.
तसे पहिले तर सागर हा जिकडे जाईल तिकडे तोच असतो. कमी कमी कोकण किनारपट्टीचा तरी.क्षितिजापर्यंत पाहिलं तर फक्त पाणीच पाणी. मग आपल्याला वेगवेगळ्या सागर किनारी जायची इच्छा का होते? हा प्रश्न पण इथे महत्वाचा नाही. विषय भरकटणे बहुतेक यालाच म्हणतात.
असो, माझा विषय होता सागर! नावातच इतकी विशालता आहे कि मन भरून जाते. मला वेळनेश्वरचा किनारा जास्त भावला. का माहित नाही पण आवडला. एक कारण असू शकते ते म्हणजे त्याची भयाणता. हो भयाणता म्हणा किवा रौद्रपणा म्हणा. तो किनाराच मुळी असा खोल खाली गेल्यासारखा आहे. त्यामुळे असेल कदाचित त्याची भयाणता जरा जास्त जाणवते. गुहागर चा किनारा पण तितक्याच आत्मीयतेने पहिला पण तो सरळ साधा वाटला. कदाचित माझा बघण्याचा दृष्टीकोन असेल तसा. पण वाटला बुवा. आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गुहागरला पाण्यात जायचे धाडस लोक करत होते. पण वेळनेश्वरचा किनारा तसा ओसाड वाटला पाण्यात पोहायला जाण्याच्या बाबतीत.
मी किनाऱ्यावर बसून भारावून गेल्या सारखा त्या सागराकडे फक्त बघतच राहतो. डोळ्यात साठवून ठेवता येत नाही म्हणून असेल कदाचित पण असेच किती तरी वेळ बघतच बसावेसे वाटते त्याच्याकडे. मन भरता भरत नाही. किनाऱ्यावर येणाऱ्या त्या लाटाचा आवाज. मंत्रमुग्ध नाही पण छान वाटतो. ती वेड्यासारखी किनाऱ्याकडे धावत येते असे वाटते. किनारा स्तब्ध असतो एक ठिकाणी न हलता. पण त्याच्याकडे हि पहिले कि वाटते कि तो हि तिला बाहुपाशात घेण्यासाठी आसुसलेला आहे. पण एक गोष्ट कधीच समजली नाही. मग अशा वेळेस ती लाट परतून का जाते त्याला सोडून? परत कधीच न येण्यासाठी. हे कोडे अजूनही मला समजले नाही. असे का होत असेल. पण किनारा तर त्याची चिंता सुद्धा करत नाही. तो तर तयार नवीन लाटांना झेलायला? प्रत्येक लाट हि त्याच्या साठी नवीन असते. हे लाटेला पण माहित नसते कि ती त्याची पहिली वहिली असावी. तिला वाटत असेल का कि मी थोडा वेळ थांबावे त्याच्या जवळ. थोडेसे हितगुज करावे. कुठून मी आले. कोण कोणते मासे माझ्या फेसाळत्या पाण्यात हुंदडले. कोण कोणत्या जहाजांनी माझ्या वेगाला टक्कर दिली. किवा कधी कधी अगदीच वैयक्तिक? मला तुझा सहवास आवडतो. मला तुझ्या जवळच थांबावेसे वाटते. वैगेरे वैगेरे.ह्या माझ्या विचारांच्या लाटा खरया खुऱ्या लाटांच्या हिंदोळयाबरोबर हिंदोळत होत्या. विचारांना काय हवे असते स्वैर विखुरणे. आणि हवे तिकडे हवे तसे विखुरणे. सगळ्याच विचारांना आचारांचे पाऊल मिळेलच असेही नाही. आणि सगळ्याच विचारांना कागद आणि पेन मिळेच असे नाही. जो खरेच मोकळ्या मनाचा असेल तो करेल हि धाडस. मी कशात मोडतो मला माहित नाही.
पण लाटांच्या आणि किनाऱ्याच्या या गाठी भेटींना बऱ्याच जणांनी आपल्या पद्धतीने समजावून घेतले आणि दुसऱ्यांनाही समजावले. त्या दोघानमधल्या नात्याला कोणी कसे घ्यायचे ते ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणखी एक म्हणजे कवीला कधी तो मी म्हणतो तसाही वाटेल. किवा कधी कधी त्यांच्या मधले नाते बाप लेकिंचे हि वाटेल. सगळी आपआपल्या मनाच्या चष्म्याची करामत आहे.
माझे सासरे म्हणाले “चला निघूयात?”
मी “कंटाळा आला?
ते “हो”.
मी “मला सागराला असेच बघत बसावेसे वाटते”
ते,”तुमचा stamina जबरदस्त आहे”
(मी ५०-६० कि मी कर चालवून इथ पर्यंत पोहोचलो होतो ना म्हणून म्हणाले असतील हि बहुदा.)
मी (स्वगत) “हा stamina मला निसर्गाने त्याच्याकडे बघत असतानाच बहाल केला आहे”
संध्याकाळ होत होती. सूर्यास्तावेळी सुर्याला सागरासमोर नतमस्तक होताना पहात मीही नतमस्तक झालो आणि घराची वाट धरली.
No comments:
Post a Comment