शिवराज गोर्ले यांना,
सस्नेह नमस्कार !
आपल्या (म्हणजे खरेच आमच्या तुमच्या) सकाळ “सप्तरंग” मधल्या “तुम्ही बदलू शकता” या लेख मालेतील २४ एप्रिल चा
“भ्रष्टाचार: नकार आणि प्रतिकार” हा लेख वाचला आणि भ्रष्टाचाराविरुद्ध छोटासा जो प्रतीकार करतोय त्याबाबतीत इथे प्रतिसाद द्यायचे धाडस करावेसे वाटले.
मी लग्न झाल्या पासून बऱ्याचदा तुळशीबागेत जात आलोय (का हे न विचारणेच बरे! J).
तर हि गोष्ट तिथल्याच महात्मा फुले मडई जवळच्या नवीन वाहनतळाची. इथे मी २००७ पासून (तुळशीबागेत गेल्यानंतर) कार पार्किंग करत आलोय.
पहिल्यापासूनच मी तासाला ५ रुपये याच दराने पार्किंग करत आलोय. पण मला अलीकडच्या काळात पार्किंगच्या दरामध्ये फरक जाणवत होता.
२-३ महिन्या आधी इथे पहिल्या तासाला १० रुपये आणि नंतरच्या प्रत्येक तासाला ५ रुपये असा दर लावला.
मी कुतूहल म्हणून पार्किंग ची चिट्ठी पाहिली (तशी मला receipt पाह्ण्याची सवयच आहे). तर त्यामध्ये काहीही बदल नव्हता.
दर तासाला ५ रुपये असेच लिहिले होते. मी प्रेमाने म्हणालो "साहेब इथे तर ५ रुपये लिहिले आहे". त्यांचे साधे उत्तर “आता दर बदलले आहेत”.
मी हि म्हणालो "मग तशी receipt द्या". ते "नाही" म्हणाले. मग मी पण पैसे देणार नाही म्हणालो. जेवढे receipt प्रमाणे झाले तेवढे देऊन निघून आलो.
तिथले पार्किंगची व्यवस्था पाहणारे लोक विचित्र नजरेने बघत होते (कार ने फिरतो आणि ५ रुपयाकडे बघतो अशा अविर्भावात बघत होते!).
पुढे आणि हे हि ऐकवले कि “परत इथे पार्किंग करायला येऊ नका”. प्रत्येक वेळी भांडून मला हि कंटाळा यायचा.
त्यामुळे कधी कधी नाईलाजास्तवाने मी हि ते म्हणतात तेवढे पैसे द्यायचो (मनाला पटत नसले तरीही कशाला वाद म्हणून!).
आता इथे हे सगळे लिहिण्याची गरज भासली कारण त्यांनी आता तर याच्या पुढचा कहर केला आहे.
मागच्याच शानिवारी मी कार पार्किंग साठी गेलो होतो, तेव्हा तासाला १० रुपये प्रमाणे पैसे मागितले. आणि receipt मात्र अजूनही तीच.
परत तेच घडले आणि परत तेच ऐकावे लागले. मला यात वाईट मागणारयाचे वाटले नाही. तर माझ्या पुढे किवा मागे जे कोणी कार वाले होते
त्यांनी विचार न करता किवा अर्धा मिनिटांची तसदी घेऊन ती receipt न वाचताच पैसे दिले त्या आमच्या सारख्या सुशिक्षित जमातीचे वाटले.
इतका का आम्हाला पैशाचा “माज” आला आहे? जर इतकेच पैसे जास्त झाले असतील तर ते कुणा गरिबाला दान करावेत
(खरे तर हे दान नाहीच विनियोग म्हणायला हवा).
साधे गणित करून पहिले. एका मजल्यावर ३०-४० गाड्या पार्क होतात. असे ५ मजले. म्हणजे २०० कार आणि अंदाजे १२ तास पार्किंग ची वेळ.
जर असेच चालू राहिले तर दिवसाला अंदाजे १२००० रुपयांचा घपला. म्हणजे महिन्याला ३.५ लाख आणि वर्षाला ४०लाख!
तो हि फक्त आमच्या सारख्यांच्या उदासीनतेमुळे? (इथे थेंबे थेंबे तळे साचे अशी साधी गोष्ट आहे, उदाहरण म्हणून सांगतो, एका माणसाला १ रुपया म्हणजे काहीच वाटत नाही, पण जर भारतातल्या सगळ्या जनतेने असाच एक रुपया दिला तर १ अब्ज आणि २० कोटी रुपये होतील!)
वरच्या प्रकारची महानगरपालीकेला माहिती हि नसेल कदाचित. किवा असेल हि आणि याला एखाद्या राजकीय नेत्याचा वरदहस्त हि असेल.
मला माहित नाही आणि माहित करून पण घ्यायचे नाही. जर आपणच याला विरोध केला (जसे या लेखात नमूद केले आहे तसे) तर मला कुणाकडे जाऊन चौकशी कशाला करायची गरज पडेल? मीच या गोष्टीला खतपाणी घातले नाही तर मग पुढच्या गोष्टींची गरजच पडणार नाही ना?
इथे हा प्रतीसाद त्या वाहनतळाच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी म्हणून केला नाही (म्हणूनच त्या वाहनतळाचे नाव हि लिहिले नाही) तर माझ्या सारख्या तिथे पार्किंग करणाऱ्या लोकांचे थोडेसे डोळे उघडावेत यासाठी केला (डोळे किलकिले करून पहिले तरी चालेल!).
जर “तुम्ही बदलू शकता” या सारख्या सदरातून मनापासून (खरे तर पोट तिडकीने) स्वतःला जिथे आणि जेवढे शक्य आहे तिथे बदला म्हणून सांगितले जाते तर या साध्या साध्या गोष्टीतून आपण बदलू शकत नाही का? असा आपण स्वतः स्वतःला प्रश्न विचारला तर किती बरे होईल?
हा प्रतीसाद वाचून एखादा जरी जागा झाला तरी माझ्या ह्या प्रतिसादाचे सार्थक झाले असे मला वाटेल.
या लेखमालेबाबतीत बोलायचे तर या लेखमालेचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. तुमच्या या लेखमालेने सर्वसामान्य माणूस जागा होतोय
हि एक प्रकारची हळूहळू का होईना घडणारी चळवळच म्हणावी लागेल. थेंबे थेंबे तळे साचे या उक्ती नुसार ह्या लेखमालेने सगळा माणूसच
जागा व्हावा आणि ह्या चळवळीचे रुपांतर क्रांतीत व्हावे हि सदिच्छा (तुम्हाला नव्हे तर आमच्या सारख्या झोपलेल्या जनतेला!)
(ह्या प्रतीसादाला कोणाला साद द्यायची असेल तर माझा ई-मेल खाली लिहिला आहे. सप्तरंग बरोबर मला हि कळवायला विसरू नका.
माझ्या सारखेच कोणी असतील जे तिथे वाहनतळावर भ्रष्टाचाराला माझ्यासारखा छोटा प्रतिकार करत असतील किवा असेच
छोटे छोटे भ्रष्टाचाराला प्रतिकार करत असतील तर त्यांनी सकाळला जरूर कळवावे. मला माझ्यासारखे आणखीहि लोक आहेत
हे वाचून समाधान मिळेल. कारण आता फक्त मला वाटते कि असे लोक असतील पण जर असे प्रतिसाद पाठवले तर मला त्याची खात्री पटेल)